ब्रिटीशांनी हिंदुस्थानींकडून 45 लाख कोटी डॉलर चोरले, संशोधकाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ब्रिटीश व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून त्यांनी देशावर राज्य केले. ब्रिटीशांनी दोनशे वर्ष हिंदुस्थानवर राज्य केले असे म्हटले जाते. तसेच या कार्यकाळात ब्रिटीशांनी देशाला लुटले. खासदार शशी थरूर यांनी ब्रिटनमध्ये ब्रिटिशांना तसे सुनावलेही. परंतु ही ही लूट नेमकी किती होती याचा नेमका हिशोब नव्हता. अलजझिरा या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

हिंदुस्थानी संशोधक उत्सा पटनाईक यांनी कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एका संशोधनात ही आकडेवारी सादर केली. तसेच ही लूट कशा प्रकारे केली गेली याचे सविस्तर विवेचनही त्यांनी आपल्या संशोधन लेखात केले आहे. ब्रिटिशांनी प्रामुख्याने कर आणि व्यापाराच्या माध्यमातून हिंदुस्थानची लूट केली. ब्रिटीश हिंदुस्थानी नागरिकांकडून सारा किंवा कर वसूली करत. नंतर ब्रिटिश हिंदुस्थानी कामगारांकडून माल विकत घेत. या मालाचे पैसे ब्रिटीश हिंदुस्थानी नागरिकांकडून वसूल केलेल्या करमधून चुकवत असत. अर्थात ब्रिटीशांच्या खिशातून हिंदुस्थानी व्यापार्‍यांना पैसे मिळत नसत. नंतर हाच माल ब्रिटीश लंडनमध्ये थोड्या फार प्रमाणात वापरत आणि बहुतांश माल हा युरोपीयन देशात ब्रिटिश विकत असत आणि त्यातून मोठा नफा ते कमवत.

नंतर १८४७ साली ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपली आणि राणीचा कारभार सुरू झाला. त्यानुसार हिंदुस्थानी व्यापार्‍यांना आपला माल इतर देशांना विकण्यास परवानगी मिळाली. ब्रिटीशांनी धूर्तपणे खेळी खेळली. हिंदुस्थान आणि इतर देशात व्यवहारासाठी ब्रिटीशांनी विशिष्ट चलनाची तरतूद केली. जर हिंदुस्थान आणि इतर देशात व्यवहार होणार असेल तर या चलनातच होणार. हे चलन घेण्यासाठी लंडनमधून हे चलन घेणे गरजेचे आहे. या चलनाच्या मोबदल्यात सोने आणि चांदी देणे अनिवार्य आहे. यामुळे हिंदुस्थानच्या वाट्याचे आणि मालकीचे सोने हे ब्रिटिशांकडे गेले आणि हिंदुस्थानची अवस्था अजूनच गलितगात्र झाली.

१७६५ ते १९३८ या १७२ वर्षाच्या काळात ही लूट केल्याचा दावा संशोधक उत्सा पटनाईक यांनी केला आहे. हे पैसे ब्रिटीशांनी आपले साम्राज्य पसरवण्यासाठी केले. प्रामुख्याने चीनवरील आक्रमण, १८५७ चे बंड थोपवण्यासाठी हे पैसे ब्रिटीशांनी खर्च केले होते.

ब्रिटीशांनी हिंदुस्थानकडून ४४.६ ट्रिलियन डॉलर अर्थात ४४.६ लाख कोटी डॉलर लुटल्याचे पटनाईक यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे. तसेच ब्रिटीशांमुळे हिंदुस्थानचा विकास झाला असे म्हटले जाते. ही बाब साफ चूक असून हिंदुस्थानमुळे ब्रिटनची भरभराट झाल्याचे पटनाईक यांनी म्हटले आहे. ब्रिटीशांनी लुटलेली राशी ही सध्या ब्रिटनच्या जीडीपीच्या १७ पट इतकी आहे. हिंदुस्थानकडून लूट केलेल्या राशीत ब्रिटीशांनी लादलेल्या कर्जाचा समावेश नसल्याचे पटनाईक यांनी नमूद केले आहे.