वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग; श्रमदानातून बांधला बंधारा, गाव टँकर मुक्त होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, तीर्थपुरी

जालना जिल्ह्यातील व घनसावंगी तालुक्यातील कोठी येथे नाल्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे लिकीज होत असलेले पाणी वाहून जात होते. या नाल्याजवळच कोठी व मंगरूळ गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी आहेत. परंतु विहिरीत जेमतेमच पाणी साचत असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, कोठी गावासाठी दरवर्षी पाण्याचे टँकर सुरू करावे लागत असे, या बाबीचा विचार करून सरपंच तुकाराम भोजने व गावकऱ्यांनी नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.

बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याला घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी सिमेंट बंधारा बांधल्यास बंधाऱ्यात कायमस्वरूपी पाणी साठा होऊन गाव टँकरमुक्त होण्यास मदत होईल असे सरपंच तुकाराम भोजने, गणेश कदम, दत्ता पांढरे या गावकऱ्यांनी त्यांना यावेळी सांगितले.

गावाला लागूनच जवळ पास दोन किलोमीटरचा नाला आहे. त्या नाल्यावरती मंगरूळ व कोठी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी विहरी आहेत. गावकऱ्यांनी श्रमदानातून उभारलेला वनराई बंधारा व त्यात अशा दुष्काळी परिस्थिती मध्ये अमूल्य पाणी जे डाव्या कालव्याला आले की या नाल्यातून वाहून जाते ते पाणी अडवल्याने गावाच्या पाण्याचा प्रश्न पुढील दोन महिने तरी मिटला आहे. या ठिकाणी सिमेंट बंधारा बांधला तर गाव कायमस्वरूपी टँकरमुक्त होईल, प्रशासनाचा टँकरवर दरवर्षी होणारा खर्च देखील कायम स्वरुपी थांबेल, अशी भावना गावकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.