
जम्मू-कश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा मोठा कट उधळून लावला आहे. कठुआ जिल्ह्यात सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफ जवानांनी गोळ्या घालून जखमी केले आणि नंतर त्याला अटक केली. सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना हिरा नगर सेक्टरमधील चांदवान आणि कोठे बीओपी (बॉर्डर आउट पोस्ट) दरम्यान घडली.
बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही संशयास्पद लोकांच्या हालचाली दिसून आल्या. सतर्क बीएसएफ जवानांनी त्यांना अनेक वेळा थांबण्याचा इशारा दिला, परंतु ते थांबले नाहीत. यानंतर जवानांनी गोळीबार केला, ज्यामध्ये एक घुसखोर जखमी झाला.
जखमी घुसखोराला अटक करण्यात आली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची ओळख आणि त्याच्या घुसखोरीमागील हेतू तपासला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.