पाकिस्तानच्या तावडीतून बीएसएफ जवानाची सुटका

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे जवान पूर्णम शॉ यांनी पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. त्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले होते. अखेर 21 दिवसांनी त्यांची सुटका झाली असून आज ते हिंदुस्थानात परतले. बीएसएफने एका निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तानी रेंजर्सनी शॉ यांना हिंदुस्थानच्या स्वाधीन केले. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. ही प्रक्रिया अतिशय शांततापूर्ण स्थितीत आणि प्रोटोकॉलनुसार पार पडली, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिली. पूर्णम शॉ हे मूळचे पश्चिम बंगालचे असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांची संपूर्ण शारिरीक आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात येईल. पाकिस्तानात 21 दिवसांमध्ये त्यांच्यासोबत काय झाले याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल, अशी माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, शॉ यांच्या गर्भवती पत्नीनेही शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.

चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुन्हा ड्युटीवर घेणार

पूर्ण शॉ यांची सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटीयारकडून कसून चौकशी करण्यात येईल. 21 दिवसांत त्यांच्यासोबत काय घडले, पाकिस्तानात काय झाले, त्यांना कशी वागणूक देण्यात आली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शॉ यांच्याकडून घेण्यात येतील. त्यानंतरच त्यांना पुन्हा सक्रिय ड्युटीवर घेण्यात येईल, असे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मोदी है तो मुमकीन है

पूर्णम शॉ यांच्या सुटकेबद्दल त्यांची पत्नी रजनी शॉ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला. पूर्णम शॉ यांनी व्हिडीओ कॉल केला होता. ते एकदम फिट आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही रजनी शॉ यांनी आभार मानले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. मोदी हैं तो मुमकीन है, असे रजनी शॉ म्हणाल्या.

अनेक बैठकांनंतर तोडगा

पूर्ण शॉ बीएसएफच्या 182 व्या बटालियनचे जवान असून 23 एप्रिल रोजी फिरोजपूरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ गस्त घालत असताना ते सीमेपलीकडे गेले. यावेळी त्यांनी गणवेश परिधान केला होता तसेच त्यांच्याकडे सर्व्हिस रायफलही होती. विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीत थांबण्यासाठी गेल्यानंतर तिथून पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. शॉ यांच्या सुटकेसाठी हिंदुस्थानी लष्कर आणि पाकिस्तानच्या रेंजर्स अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. अखेर अनेक बैठकानंतर तोडगा निघाला आणि शॉ यांची सुटका झाली.