
आर्थिक तोटा सहन करणाऱया सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 80 हजार कर्मचाऱयांसमोर व्हीआरएसचा पर्याय खुला केला आहे. वयाची 50 वर्षे पूर्ण केलेले बीएसएनएलचे कर्मचारी उद्या 4 नोव्हेंबरपासून व्हीआरएस घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. कर्मचाऱयांना ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्यासाठीही पैसे नसलेल्या बीएसएनएलचे या व्हीआरएस योजनेद्वारे 7500 कोटी रुपये वाचणार आहेत.
व्हीआरएससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 दिवस सुरू राहणार आहे. अर्ज करणाऱया कर्मचाऱयांना त्यांच्या सेवेतील उर्वरित वर्षासाठी 100 ते 125 टक्के वेतन मिळणार आहे. यात पेन्शनचादेखील समावेश असेल. व्हीआरएस लागू होण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा वेळ लागणार असून व्हीआरएस घेणाऱया कर्मचाऱयांमुळे बीएसएनएलच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे बीएसएनएलकडून स्पष्ट करण्यात आले.
बीएसएनएलमध्ये सध्या 1.59 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 1.6 लाख कर्मचाऱयांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे.
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बीएसएनएलमधील कर्मचाऱयांवरील खर्च 14 हजार 492 कोटी इतका होता.
पुढील तीन-चार महिने पगार उशिरानेच
बीएसएनएलमध्ये कार्यरत राहणाऱया कर्मचाऱयांना पुढील तीन-चार महिने उशिरानेच पगार मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार महिन्याच्या सुरुवातीलाच कर्मचाऱयांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते, पण पैसे खात्यात जमा होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही परिस्थिती आणखी तीन-चार महिने कायम असणार आहे.





























































