
सामना ऑनलाईन । लखनौ
बलात्काराच्या आरोपानंतर फरार झालेला बसपाचा खासदार अतुल राय याने आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर राय याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अतुल राय हे घोसी मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. निवडणूकीच्या प्रचारावेळी एका विद्यार्थीनीने अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. त्यानंतर मायावती व अखिलेश यादव यांनी त्यांचा प्रचार केला होता. जिंकून आल्यानंतर शपथविधीच्या आधी ते शरण येतील अशी चर्चा होती. मात्र शपथविधीच्या वेळीही त्यांचा काहीच थांगपत्ता नव्हता. अखेर आज त्यांनी वाराणसीच्या न्यायालयात शरणागती पत्कारली. मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


























































