‘अधिवेशनावर निवडणुकांचा परिणाम, पण मी विनंती करतो…’, पंतप्रधान मोदींचे राजकीय पक्षांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून या अधिवेशनावर कोरोनासोबत पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचेही सावट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील या अर्थसंकल्पाकडेच अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि राजकीय पक्षांना एक आवाहन केले.

आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि देशभरातील सन्माननीय संसद सदस्यांचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीत, देशासाठी विपुल संधी उपलब्ध आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात केवळ देशाची आर्थिक प्रगतीच नव्हे, तर देशातील लसीकरण अभियान, हिंदुस्थानने स्वतः संशोधन करुन विकसित केलेली लस संपूर्ण जगात देशाविषयी एक विश्वास निर्माण करणारी ठरली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Omicron पेक्षा ‘ओ मित्रों’ जास्त धोकादायक, याचा ‘सौम्य प्रकार’ही नाही! – शशी थरूर

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, आम्हा सर्व खासदारांची चर्चा, आपल्या खासदारांच्या चर्चेचे मुद्दे, मोकळ्या मनाने केलेली चर्चा, जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याची एक महत्वाची संधी ठरू शकते. मला आशा आहे, की सर्व आदरणीय खासदार, सर्व राजकीय पक्ष, अधिवेशनात मोकळ्या मनाने चर्चा करुन, प्रगतीच्या मार्गांवर वाटचाल करण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी निश्चितच मदत करतील, असेही ते म्हणाले.

ही खरे आहे, की वारंवार होत असलेल्या निवडणुकांचा परिणाम या अधिवेशनांवरही होतो, चर्चावर देखील त्याचा परिणाम जाणवतो. मात्र, मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो, की निवडणुका आपल्या जागी असतात, त्या सुरुच राहणार आहेत.मात्र आपण सभागृहात.. संसदेचे हे अधिवेशन, एकप्रकारे पूर्ण वर्षभराचा आराखडा मांडणारे असते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचेही असते. आपण सर्वांनी पूर्ण कटिबद्धतेने, हे अधिवेशन जितके जास्त फलदायी ठरवू शकू, तेवढ्याच जास्त संधी आपल्याला आगामी आर्थिक वर्षात, देशाची प्रगती करण्यासाठी मिळू शकतील. मुक्त चर्चा व्हावी, सभागृहाची प्रतिष्ठा जपत गांभीर्याने चर्चा व्हावी, मानवी संवेदनांचा विचार करुन चर्चा व्हावी, उत्तम उद्देशाने चर्चा व्हावी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

पाच राज्यांच्या निवडणुकीचा प्रभाव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्षासाठी अवघड पेपर असल्याने या बजेटमधून पाच राज्यांवर मेहेरनजर करून जनमत आपल्याकडे वळविण्याचा सत्ताधारी पक्षाचा खटाटोप असेल. निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने बजेटचा सोपस्कार उरकल्यानंतर संसदेतील बहुतांश खासदार राजकीय प्रचारात मग्न होतील. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वार्ध नीरसच ठरण्याची शक्यता आहे. पेगासस हेरगिरी, लडाखमधील चीनची घुसखोरी, एअर इंडियाची विक्री, शेतकऱ्यांचा प्रश्न यावरूनही अधिवेशन वादळी ठरेल.