संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होत असून एक महिन्याचा अवकाश कालखंड वगळता ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळापत्रकाची माहिती दिली.

31 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणाऱया अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणही सादर केले जाईल. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडतील. त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होईल. त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरदेखील दोन्ही सभागृहांत चर्चा होईल. अधिवेशनाचा पूर्वार्ध आटोपल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत अधिवेशनासाठी सुट्टी असेल. अधिवेशनाचा उत्तरार्ध 12 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत असेल. या काळात पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 27 बैठका होणार आहेत. या वर्षी देशात दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.