गलवानमधून हिंदुस्थानचे जवानही दीड कि.मी. मागे. संघर्ष झालेला 4 कि.मी. परिसर ‘बफर झोन’

713
galwan-valley

पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यातून चिनी सैन्यानंतर आता हिंदुस्थानी लष्करही मागे हटले आहे. 15 जून रोजी संघर्ष झालेल्या ठिकाणापासून दीड किलोमीटर मागे जवान आले असून, पॉइंट-14 येथील पेट्रोलिंग सध्या बंद आहे. दरम्यान, गलवान खोर्‍यात चार किलोमीटरचा परिसर ‘बफर झोन’ असणार आहे.

ज्या ठिकाणी 15 जूनला हिंसक संघर्ष झाला, त्या पेट्रोलिंग पॉइंट-14 पर्यंत हिंदुस्थानी लष्कराने रस्ता तयार केला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चार किलोमीटरपर्यंत अंतर असेल. सहा किलोमीटर परिसरात दोन्ही देशांचे प्रत्येकी केवळ 80 सैनिक असतील, असेही वृत्त आहे. गलवानबरोबरच हॉटप्रिंग, गोग्रा येथूनही हिंदुस्थानी आणि चीनचे सैनिक माघार घेतील.

…तर पेट्रोलिंगचा अधिकार गमावू शकतो

गलवान खोर्‍यात 15 जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. चीनचे 43 सैनिक ठार झाले. या संघर्ष झालेल्या ठिकाणापासून चीनप्रमाणेच हिंदुस्थानचे जवान दीड किलोमीटर मागे हटले आहेत.

गलवान खोर्‍यात पेट्रोलिंग पॉइंट-14 पर्यंत जाऊन हिंदुस्थानचे जवान गस्त घालत होते. मात्र, 30 जूनच्या कमांडरस्तरावरील चर्चेनंतर पुढील 30 दिवस येथे गस्त घालू शकणार नाहीत. पुढील बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर हिंदुस्थानी लष्कर कायमस्वरूपी पेट्रोलिंगचा अधिकार गमावू शकेल.

सीमेजवळ हिंदुस्थानच्या मिग-29, ‘अपाचे’चा सराव

पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यातून चिनी सैन्य मागे हटले तरी दगाबाज लाल माकडांवर विश्वास ठेवता येत नाही. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हिंदुस्थानचे लष्कर, हवाईदल अलर्ट आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील (एलएसी) फायटर बेस येथे सोमवारी मध्यरात्री हिंदुस्थानच्या फायटर विमानांनी कसून सराव केला. ‘मिग-29’ लढाऊ विमाने, ‘अपाचे’ आणि ‘चिनूक’ हेलिकॉप्टर्स यात सहभागी झाली होती. चीनच्या कुरापती वाढल्यास हिंदुस्थाननेही सीमेवर तयारी सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या