
सामना प्रतिनिधी, मुंबई
विक्रोळी कन्नमकारनगरातील म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या इमारत क्रमांक 43 चा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सदर इमारत मोडकळीस आलेली असल्याने याआधीच रिकामी केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कन्नमवार नगरातील म्हाडा वसाहतीमधील अनेक इमारती मोडकळीस आलेल्या आहेत पण त्यांचा पुनर्विकास रखडल्याने रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. म्हाडाच्या इमारत सुरक्षा मंडळाने 43 क्रमांकाची तीन मजली इमारत 2018 मध्ये धोकादायक ठरवून खाली केली होती. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने धोकादायक असलेल्या या इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, पण सुदैवाने इमारत खाली असल्याने कोणतीही हानी झाली नाही.


























































