
मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भटक्या गुरे-जनावरांना ठेवण्यासाठी जसे मुंबईत शेल्टर्स होम्स (कोंडवाडे) आहेत त्याच धर्तीवर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम्स उभारा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिकेकडे केली आहे.
मुंबईत उशिरा रात्री आणि पहाटे भटकी कुत्री टोळक्याने फिरतात. एकटे दुकटे पादचारी, कचरा वेचणाऱ्यांवर ही कुत्री धावून जातात. यावर उपाय म्हणून पालिकेतर्फे अशा कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. दरवर्षी किमान 30 टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणे आवश्यक असते. मात्र, त्या प्रमाणात ते होत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी गुरे आणि जनावरांसाठी जसे शेल्टर होम्स आहेत तशा प्रकारचे शेल्टर्स होम्स भटक्या कुत्र्यांसाठी उभारावेत, अशी मागणी नगरसेवक सचिन पडवळ यांनी महासभेत ठरावाची सूचना मांडली आहे. दरम्यान, महापालिका या ठरावाबाबत सकारात्मक असून मंजुरी मिळाल्यावर पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.
























































