
कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये एसआरए योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱया इमारतीच्या एका विंगचे बांधकाम हे प्रस्तावित रस्त्यात करत आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद दिली जात नाही. हे बांधकाम थांबवा नाहीतर शिवसेना एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे.
कुर्ला येथील नेहरूनगरमधील अंगोलीमाला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए योजनेतील इमारतीच्या ‘डी’ विंगचे बांधकाम हे रोडलाईनमध्ये म्हणजे बर्वे रोड आणि मदर डेअरी रोडच्या फॅनिंग भागामध्ये बांधले जात आहे. या जागेवर प्रस्तावित रस्ता आणि मेट्रो लाईन असतानाही इमारतीचे बांधकाम आराखडे एसआरएने मंजूर केले आहे. याबाबत एसआरएच्या अधिकाऱयांनी पाहणी केली, मात्र कोणतीही कारवाई केली नाही. मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानेही एसआरएला याबाबत अनेक वेळा लेखी स्वरूपात कळवले आहे. या जागेवर बांधण्यात आलेली इमारत वाचवण्यासाठी या योजनेतील अनिवासी गाळय़ांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकारी, विकासक आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी अनिवासी गाळेधारकांवर दबाव निर्माण करत आहे. ही बाब गंभीर असून प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या जागेवरील इमारत निष्कासित करून सुधारित इमारतीचे आराखडे मंजूर करावेत. त्यासाठी महापालिका, एसआरए, विकासकाची संयुक्त बैठक घ्यावी. नाहीतर एसआरएच्या कार्यालयात शिवसेनेकडून ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी प्राधिकरणाला दिला आहे.

























































