‘केसरबाई’जवळील ‘मलिका’, ‘नुरी मेन्शन’ मोडकळीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
building-collapse-dongari2

सामना प्रतिनिधी । मुंबई

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त ‘केसरबाई’शेजारील मलिका, नुरी मेन्शन या बिल्डिंगदेखील मोडकळीस आल्या आहेत. मलिका बिल्डिंगची मालकी घेतलेल्या बी.एस.बी. डेव्हलपर्सने आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगून पुनर्विकासाची चालढकल सुरू केली आहे. या बिल्डरला आमची फिकीर नाही. त्यामुळे एक दिवस आम्हीही गाडले जाऊ, या भीतीच्या भूताने ‘मलिका’च्या रहिवाशांना बेचैन केले आहे.

तीन माळ्यांच्या ‘मलिका बिल्डिंग’मध्ये (हुसैनअली मंझील) भाडेकरूंचे नऊ रूम आणि बिल्डरचे तीन रूम आहेत. 37 वर्षांपूर्वी बिल्डिंगची दुरुस्ती केली गेली. त्यानंतर देखभालीकडे पूर्णत: डोळेझाक केली. त्यामुळे आम्ही आता मरणाच्या जबडय़ात राहतोय, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली. शंभर वर्षे जुनी असलेल्या या बिल्डिंगचे पिलर्स पूर्णत: सडले असून घरातच मिटर असल्यामुळे छप्पर कोसळण्याबरोबरच शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचीही भीती आहे. बिल्डिंगमध्ये एक गावकीचा रूम आहे. गावाहून कॉलेज वा अन्य शिक्षण घेण्यासाठी इथे आलेली मुले केसरबाई बिल्डिंग कोसळल्यानंतर लगेच निघून गेल्याचे आनवारे यांनी सांगितले. बाजूलाच असलेल्या नुरी मेन्शन बिल्डिंगची दुर्दशा झाली आहे. येथील रहिवाशांचेही जगणे असुरक्षित झाले आहे.

आम्ही या बिल्डिंगमध्ये 25 वर्षांपासून राहतोय. बीएसबी डेव्हलपर्सने बिल्डिंगच्या पुनर्विकासाचे काम घेतलेय. मात्र त्याची सुरुवात केली नाही. योग्य देखभाल नाही. त्यामुळे बिल्डिंग खिळखिळी झालीय. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून जीव धोक्यात घालून राहतोय.
– हुजूर हसनमियाँ आनवारे, रहिवासी, मलिका बिल्डिंग

डोंगरी परिसरातील बहुतांश बिल्डिंग 100हून अधिक वर्षे जुन्या आहेत. बेकायदा बिल्डिंग मोठय़ा प्रमाणावर आहेत. प्रशासनाची मिलिभगत असल्यामुळे सारे आलबेल आहे. या बेकायदा बिल्डिंगनी पार्किंगची जागा खाल्लीय. चालायला जागा नाहीय. तिथे फायर बिग्रेडसारख्या आपत्कालीन सेवांचा गाडय़ा कशा येणार? येथील ट्रस्टच्या कोर्टात केस आहेत. त्यामुळे येथे डेव्हलपमेंट होत नाही.– सय्यद इम्तियाज हुसैन, उपशाखाप्रमुख, डोंगरी

शेजारची केसरबाई बिल्डिंग कोसळल्यापासून धाकधूक आणखीन वाढलीय. आमची बिल्डिंग कधीही कोसळेल. पावसाचे पाणी पडून बिम सडलेत, भिंती खचल्यात, लाद्या उखडल्यात, जिन्यांच्या फळ्या तुटल्यात. बिल्डरच्या इंजिनीअरला सगळे काही दाखवलेय; पण काही उपयोग झालेला नाही.
– यास्मीन यासीन शेख, रहिवासी, मलिका बिल्डिंग

मरियम इब्राहिम बिल्डिंगचे भाडेकरू नऊ वर्षे बेघर
चार माळ्याच्या मरियम इब्राहिम बिल्डिंगचे दोन माळे नऊ वर्षांपूर्वी पुनर्विकासाच्या हेतूने बीएसबी डेव्हलपर्सने तोडले. मात्र पुनर्विकास सुरूच झालेला नाही. त्यामुळे घराचा ताबा सोडलेल्या रहिवाशांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. बिल्डरने सहा वर्षांपासून भाडे देणेही बंद केले आहे. म्हाडादेखील आम्हालाच पैसे जमा करून बिल्डिंग उभा करण्यास सांगते. आमच्यापैकी कुणी टॅक्सीवाला, तर कुणी साधी नोकरी करतोय. कुटुंब चालवणे मुश्कील होत असताना बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे कोठून आणू, असा सवाल इम्तियाज इस्माईल पटनी यांनी केला. अत्तराच्या दुकानात काम करणारे मोहम्मद युसूफ अब्दूल गनी तुरक यांनी पोट भरायचे की घरभाडे द्यायचे, हा प्रश्न सतावत असल्याचे सांगितले.