बुलढाण्यातील बुलेट राजा गँगचा पर्दाफाश, चार बुलेट जप्त

राज्यातील विविध शहरातून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाऱ्या बुलढाण्यातील बुलेट राजा गँगचा पुण्यातील फरासखाना पोलिसांनी पर्दापाश केला. त्यांच्याकडून चार बुलेसह पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रामेश्वर सूर्यभान वाघ (वय 20 रा. पिंपळगाव, ता. देऊळगाव राजा, बुलढाणा), शुभम सुनिल डोईफोडे (वय 22 रा. जळगाव, सिंदखेड राजा), आकाश सतोष काकड आणि हर्षद भगवान गंगतीरे (दोघे रा. किनगाव राजा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी अकोला, संभाजीनगर, पुणे ग्रामीण, बीड जिल्ह्यातून बुलेट दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली.

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील आणि एपीआय मनोज अभंग यांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात आरोपी रामेश्वर वाघ आणि शुभम डोईफोड यांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी बुलेटची चोरी केल्याची कबुली देत वाहने बुलढाण्यात ठेवल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, सचिन सरपाले, समीर माळवदकर, अभिनय चौधरी यांच्या पथकाने बुलढाणा जिल्हयामध्ये घेवुन जावुन किनगाव राजा गावामधून चार दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर आरोपींचे दोन साथीदार आकाश काकड आणि हर्षद गंगतीरे यांना अटक केली.

चौकशीत आरोपी हर्षदने बीड जिल्ह्यातून एक बुलेट आणि मोटार चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद मोहन दळवी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या