
चार चिमुरड्या मुलींसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान सोमवारी सकाळी पाचही मृतदेह विहिरीत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
माळेगाक येथील उज्ज्वला बबन ढोके (35) हिच्या पतीने एक ते दीड महिन्यापूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर उज्ज्वला ही चार मुली वैष्णवी (9), दुर्गा (7), आरुषी (4) ल पल्लवी (1) यांच्यासोबत माळेगाव येथेच राहत होती. रविवारी चार मुलींना सोबत घेऊन ती मारोती पेठ शिवारात शेतीकामासाठी गेली होती. सायंकाळी अंदाजे चार काजता ती सोबतच्या महिलांना लवकर घरी जाते असे सांगून निघून गेली. तिने चारही मुलींना एका विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तिच्या नातलगांनी रविवार रात्रीपासूनच तपास सुरू केला असता आज सोमवारी विहिरीत त्यांचे मृतदेह दिसले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.
ही माहिती मृत उज्ज्वला बबन ढोके यांचे दीर योगेश ढोके यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलिसांनी घटनेची नोंद केली. या घटनेची माहिती मिळताच जानेफळ येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष कृष्णा हावरे व त्यांचे मित्र विजय जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून तत्काळ पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. ते मेहकर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आज सायंकाळी पाचही मृतदेहांवर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



























































