बुमराह काहीही करू शकतो !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाने नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यात अफलातून कामगिरी नोंदवली. या दौऱ्यात हिंदुस्थानी संघाने तीनही मालिकांमध्ये यजमान संघाला ‘व्हाइटवॉश’ दिला. कसोटी क्रिकेट मालिकेत तर हिंदुस्थानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने हॅटट्रिक घेत टीम इंडियाला नेत्रदीपक  विजय मिळवून दिला दिला. बुमराहने कसोटी मालिकेत तब्बल 13 विकेट मिळवल्या. आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेतून त्याला विश्रांती  देण्यात आली असली  तरी त्याच्या भन्नाट गोलंदाजीची आफ्रिकन खेळाडू स्तुती करताना दिसत आहे.

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने जसप्रीत बुमराहची एका मुलाखतीत स्तुती केली. गोलंदाजीबाबत बोलताना रबाडा म्हणाला की आर्चरची प्रतिभावान गोलंदाजी ही त्याला मिळालेली दैवी देणगी आहे. बुमराहदेखील उत्तम गोलंदाज आहे. बुमराह गोलंदाजीत काहीही करू शकतो. तो मैदानावर जादू घडवू शकतो. अशा गोलंदाजांचे मला नेहमीच कौतुक वाटते, अशा शब्दात रबाडाने बुमराहवर स्तुतीसुमने उधळली.

हिंदुस्थान  दौऱ्याबाबतही रबाडाने  मतप्रदर्शन  केले. “कारकिर्द घडवणे हे सोपे नसते. कारकिर्दीत कायम चढ उतार असतात. प्रत्येक गोलंदाजाला जसे वाटत असते तसेच मलाही जगातील सर्वोत्तम खेळाडू व्हायचं आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यावर अशी स्पर्धा करावीच लागते. पण मी मालिकेबाबत किंवा क्रिकेट कारकिर्दीबाबत फारसा चिंताग्रस्त नाही. मी प्रत्येक सामना आनंदी मनाने खेळतो आणि पुढेही मी असाच खेळत राहणार आहे”, असे तो म्हणाला.