खासगी बसच्या चालकाकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, गोणीत कोंबून रस्त्यावर सोडलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी बसचालकाने एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना वसईत घडली आहे. या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळी वसईतील एका रस्त्यावर लोकांना एक गोण सापडली. त्या गोणीतून हालचाल जाणवल्याने वाटसरूंनी ती उघडली. तेव्हा त्यात एक चार वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आणि आरोपीचा शोध सुरू केला.

मुलीच्या आईने दाखल केली होती तक्रार

मुलीची ओळख पटवत असताना तिच्या आईने त्याच दिवशी दुपारी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार केल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं. त्यावरून शोध घेत वसई पश्चिम येथील माणिकपूर येथून आरोपीला अटक करण्यात आली.

असा आहे घटनाक्रम

हा 34 वर्षीय नराधम आरोपी अंधेरीतील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करतो. त्याची बस भाईंदर पश्चिमेला सुभाष चंद्र बोस मैदानावर अनधिकृतरित्या पार्क केलेली असते. याच भागात असलेल्या झोपडपट्टीत पीडिता राहते.

रविवारी दुपारी पीडिता आणि त्या झोपडपट्टीतील रहिवासी असलेले तिचे काही सवंगडी आरोपीच्या बसमध्ये खेळत होते. त्यावेळी आरोपी आणि त्याचा मित्र दारू पित बसले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला आरोपीने बस वसईला नेण्याचा निर्णय घेतला. कारण, सोमवारी सकाळी त्याला वसई येथे राहणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जायचं होतं.

आरोपीने बस सुरू करताच त्याच्या बसमध्ये खेळत असलेली मुलं खाली उतरली. पण, पीडिता गाडीतच राहिली. ते लक्षात येऊनही आरोपीने बस सुरू केली आणि तिथून निघून गेला. पण, ही गोष्ट पीडितेच्या सवंगड्यांनाही लक्षात आली आणि त्यांनी ही बाब पीडितेच्या कुटुंबाला सांगितली. पीडितेच्या आईने त्वरित भाईंदर पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.

निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार, गळा आवळून गोणीत कोंबलं

मुलीला पळवल्यानंतर तो बस एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने रडून ओरडायला सुरुवात केल्यामुळे त्याने तिचा गळा आवळला. ती मुलगी बेशुद्ध पडली. मात्र, त्याला ती मृत्यू पावली असे वाटल्याने त्याने गाडीत असलेल्या गोणीत तिला कोंबलं आणि वसई पूर्वेतील फातेरवाडीच्या पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर फेकून दिलं. गोणी फेकून दिल्यानंतर तो सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान फरार झाला.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार, अपहरण, खुनाचा प्रयत्न तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.