
परोपकार आणि दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी दान करण्याच्या परंपरेत अग्रेसर राहून एचसीएल टेक्नॉलॉजिचे प्रमुख शिव नाडर यांनी स्वतःला आधुनिक ‘कर्ण’ सिद्ध केले आहे. नाडर आणि त्यांच्या परिवाराने यंदा आपल्या मिळकतीतील 826 कोटी रुपये गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. अर्थात दानवीरांच्या यादीत विप्रोचे अझीम प्रेमजी आणि रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानीही मागे नाहीत. एडलगीव्ह हुरून इंडियाने केलेल्या दानशूरांच्या 2019 च्या सर्वेक्षणात नाडर पहिले तर प्रेमजी दुसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.
केंद्र सरकारने 2013 मध्ये उद्योगांत एका निश्चित मर्यादेहून अधिक नफा कमविणाऱ्या उद्योगांनी सामाजिक कार्यासाठी नफ्याच्या किमान 2 टक्के रक्कम दान करायला हवी असा कायदा केला आहे. कंपनी लॉमधील या बदलानंतर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) खात्यातील जमा दानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा, सामाजिक उपक्रमांसाठी 5 कोटींहून अधिक दान देणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या यंदा 72 झाली आहे. ती 2018 मध्ये 38 होती.
दानवीरांची मांदियाळी
एडलगीव्ह फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार उद्योगपती शिव नाडर आणि कुटुंबीयांनी यंदा 826 कोटी रुपयांचे दान परोपकारासाठी दिले आहे. त्यापाठोपाठ विप्रो उद्योगसमूहाचे प्रमुख अझीम यांनी 453 कोटी रुपये तर रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 402 कोटी रुपये परोपकारासाठी दान केले आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेंकनी आणि त्यांची पत्नी रोहिणी यांनी आपल्या उत्पन्नातील 346 कोटी रुपये सामाजिक कार्यांसाठी खर्च केले आहेत.
दरम्यान, यंदा परोपकारी कार्यासाठी जमणारी दानाची पुंजी दुप्पट होऊन 4391 कोटीं रुपयांवर पोचली आहे. विशेष म्हणजे या दानात योगदान देणारे सर्वाधिक वैयक्तिक दानवीर आहेत. बहुतांश दानशूरांनी शिक्षणाला अधिक पसंती दिली असून त्यापाठोपाठ वैद्यकीय सेवेचा क्रमांक आहे.



























































