बायजूच्या सीईओ पदावरून रविंद्रन यांना हटवण्याचा प्रस्ताव मंजूर

बायजू या कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी पदावरून बायजू रविंद्रन यांना हटवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. बायजू कंपनीच्या गुंतवणूकदारांनी विशेष सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

या प्रस्तावात बायजू रविंद्रन यांना सीईओ पदावरून हटवणे तसेच नेतृत्वात बदल करणे या दोन्ही मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रविंद्रन यांना आता पदावरून पायउतार व्हावं लागेल अन्यथा त्यांची गच्छंती निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. या सभेत कंपनीतील आर्थिक अफरातफर, प्रशासकीय कारभार आणि अन्य तक्रारींशी संदर्भातील प्रस्तावही मान्य करण्यात आले आहेत.

यातील एका मुख्य प्रस्तावानुसार, बायजूच्या सद्यस्थितीत बदल आणण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती. यामुळे बायजूवरील थिंक अँड लर्न या संस्थेचं नियंत्रण संपुष्टात येणार आहे. या बैठकीत जे निर्णय मंजूर होतील, ते कर्नाटक उच्च न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहेत.