
परकीय निधीसंबंधिक कायद्यांचं उल्लंघन केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने BYJU’s या शैक्षणिक पोर्टलला 9 हजार कोटींची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी ईडीने BYJU’sशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. त्या छापेमारीत अनेक आक्षेपार्ह डीजिटल डेटा हाती लागल्याचा दावा ईडीने केला होता.
त्यानुसार, कंपनीला 2011 ते 2023 या कालावधीत 28 हजार कोटींचा परकीय निधी मिळाला आहे. त्याखेरीज कंपनीने याच काळात परदेशातील थेट गुंतवणुकीच्या नावाखाली 9754 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. तसंच, कंपनीने जाहिरात आणि मार्केटिंग खर्चांच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपयेही जमा केले आहेत, असा दावा ईडीने केला होता.
तसंच कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षापासून आपला आर्थिक लेखाजोखा तयार केलेला नसून खात्यांचं ऑडिटही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कंपनीने दिलेल्या आकड्यांची शहानिशा करण्यासाठी ईडीने आता बँकांची मदत घेतली आहे. तसंच, तक्रारीनंतर जेव्हा BYJU’sचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी रवींद्र बायजू यांना समन्स जारी करण्यात आले होते. पण, ते कधीही चौकशीला हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी कधीच समन्सला उत्तरही दिलेलं नाही. याचा ठपका ठेवून ईडीने BYJU’sला 9 हजार कोटींची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.
























































