
बीसीसीआयच्या इम्पॅक्ट प्लेअरवर होत असलेली टीका अजूनही थांबलेली नाही, पण त्यांनी आपली प्रयोगशाळा सुरू ठेवली असून आगामी सी. के. नायुडू करंडक स्पर्धेपासून टॉसबंदीचा प्रयोग सुरू करणार आहेत. आगामी मोसमात टॉस बंद केला जाणार असल्याने प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हा निर्णय पाहुण्या संघाला देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयचा ‘अतिथी निर्णय घेवो’चा प्रयोग किती दिवस रंगेल हे मात्र अनिश्चित आहे.
क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत संघटना असलेल्या ‘बीसीसीआय’ने आपली मोठी प्रयोगशाळा सुरू केली असून ते एकावेळी अनेक प्रयोग करणार आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये सुरू केलेला इम्पॅक्ट प्लेअरचा प्रयोग टीकेचा धनी ठरल्यामुळे ‘बीसीसीआय’ या नियमाचा लवकरच फैसला घेणार आहे. या नियमामुळे आयपीएलमध्ये धावांचा आणि षटकारांचा पाऊस पडला असला तरी 11 खेळाडूंच्या या खेळाचे 12 खेळाडू झालेत. त्यामुळे हा प्रयोग बीसीसीआयला क्रिकेटच्या हितासाठी बंद करावा लागणार असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे.
इम्पॅक्ट प्लेअरनंतर बीसीसीआय आता सी. के. नायुडू करंडकात टॉसबंद करणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात टॉस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे टॉसला पर्याय नाही, पण बीसीसीआयचा हा प्रयोग काही काळापुरताच असण्याची शक्यता आहे. क्रिकेटमध्ये इंग्लंड क्रिकेट मंडळाने 2016 ते 2019 या चार मोसमात काQटी क्रिकेट स्पर्धेदरम्यान टॉस बंद केला होता. त्यांच्या या नियमावर खूप टीका झाली आणि अखेर चार वर्षांच्या प्रयोगानंतर त्यांना पुन्हा टॉस उडवायची प्रथा सुरू करावी लागली. बीसीसीआयचा हा प्रयोगही फसण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग सी. के. नायुडू करंडकापुरताच ठेवला आहे. तो अन्य स्पर्धांत लागू होण्याची शक्यता कमीच आहे.
दुलीप करंडकात विभागीय संघांची पद्धत बंद होणार
दुलीप करंडक स्पर्धा आतापर्यंत विभागीय पद्धतीने खेळविली जायची, पण आगामी मोसमात या स्पर्धेसाठी चार संघ राष्ट्रीय निवड समिती निवडेल आणि हे संघ एकमेकांशी भिडतील. त्याचप्रमाणे रणजी करंडक स्पर्धाही दोन टप्प्यांत खेळविण्याची प्राथमिक तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे.
आता फलंदाजी–गोलंदाजीच्या कामगिरीवर गुण
इंग्लिश काQटीत सुरू असलेली गुणपद्धत सी. के. नायुडू करंडकात वापरली जाणार आहे. पहिल्या डावातील फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीवरून संघांना गुण दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे परंपरागत पहिल्या डावातील आघाडीचे आणि विजयाचे गुणही संघाला मिळणार आहेत. इंग्लिश काQटी सुरू असलेली गुणपद्धत नायुडू करंडकात यशस्वी ठरली तर रणजी करंडकातही हीच गुणपद्धत अवलंबिली जाणार आहे.































































