कुणाला कुठे जायचे तिथे जाऊद्यात, माझ्या शुभेच्छा! नितीश कुमार यांचा प्रशांत किशोर यांना टोला

1084

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या जेडीयू नेते प्रशांत किशोर आणि माजी खासदार पवन वर्मा यांना बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी खडेबोल सुनावले आहेत. ‘आपली वेगळी मते मांडून कुणाला पक्षापासून वेगळी चूल मांडायची असेल तर मांडू देत. त्यांना जायचे तिथे जाऊन द्या. माझ्या शुभेच्छा आहेत. ते विद्वान लोक आहेत. ते भले माझा सन्मान करोत अथवा नाही. मी मात्र त्यांचा सन्मान ठेवणार,’ असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

‘बिहारच्या संयुक्त जनता दल (जेडीयू ) सरकारची धोरणे आणि नीती स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही गोंधळात काम करीत नाही. त्यामुळे पक्षातील कुणाला काही खटकत असेल तर त्याने मला अथवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. उगाच हवेत बाण मारून पक्षात असंतोष निर्माण करू नये,’ असं म्हणत नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रशांत आणि पवन वर्मा यांच्याबाबत नाराजी

प्रशांत किशोर यांचे जेडीयूच्या स्थापनेत कोणतेही योगदान नाहीय. पक्षाची भूमिका पटत नसेल तर त्यांनी आपला वेगळा मार्ग स्वीकारावा. शिवाय दिल्लीतील भाजप-जेडीयू युतीबाबत नाराजी व्यक्त करणारे माजी खासदार पवन वर्मा यांनी थेट प्रसारमाध्यमांशी बोलून आपला असंतोष प्रगट करावा हा शिस्तभंगाचाच प्रकार आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री नितीश यांच्याकडे बोलणार आहे, अशी नाराजीची भूमिका जदयू प्रदेश अध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या