‘नागरिकत्व’ कायद्यावरून विधानसभेत गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्यावरून बुधवारी विधानसभेत काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार राडा झाला. हा कायदा घटनाबाह्य असून या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नका, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली. भाजपने घटनाबाह्य शब्दावर आक्षेप घेत घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजपच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त शब्द कामकाजातून काढून टाकल्याचे जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अशोक चव्हाण यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नका अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला जितेंद्र आव्हाड व अमिन पटेल यांनी पाठिंबा दिला. यावेळी भाषण करताना अशोक चव्हाण यांनी हा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगितले. या कायद्याला घटनाविरोधी म्हटल्याने भाजपचे सदस्य संतापले आणि घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या घटनाबाह्य या शब्दावर हरकत घेतली. घटनाबाह्य कायदा हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू होती. अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनाबाह्य शब्द वगळण्याचे जाहीर केल्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.