सीएए, एनआरसीचे फायदे सांगणाऱ्या भाजप नेत्याला बदडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या मुद्द्यांवरून देशभरात आगडोंब उसळलेला असतानाच उत्तर प्रदेशात त्याचे फायदे समजवायला गेलेल्या एका भाजप नेत्याला लोकांनी बदडून पिटाळून लावले. यानंतर या नेत्याने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

सैयद मुर्तजा आगा काझमी असे या भाजपच्या अल्पसंख्याक शाखेच्या सरचिटणीसाचे नाव असून ते अमरोहा येथील लकडा मोहल्ला भागात या दोन कायद्यांच्या फायद्यांचे गुणगान गात होते. हे कायदे कसे चांगले, कसे फायद्याचे हे ते सांगत असतानाच लोकांनी त्यांना चोप दिला. यामुळे काझमी याला तेथून पळून जावे लागले.

या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना काझमी म्हणाले की, अमरोहा येथील लकडा मोहल्ला भागात मी एका दुकानात गेलो. तेथे काही मुस्लिम तरुण होते. त्यांना मी सीएए आणि एनआरसी कायद्यांवरून जागरूकता करू लागलो. त्याचवेळी तेथे असलेल्या राजा अली नावाच्या व्यक्तीने अचानक माझ्यावर हल्ला चढवला. त्याने माझा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मी कशी तरी सुटका करून घेतली. आता याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे, असेही ते म्हणाले.