CAA विरोधात देशभरात तीव्र आंदोलन; बिहारमध्ये कडकडीत बंद, मेरठमध्ये हिंसाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकता सुधारणा कायद्याला देशभरातून तीव्र विरोध होत असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने या कायद्याविरोधात बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरजेडीचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले होते. दरभंगामध्ये कार्यकर्त्यांनी कपडे काढून आंदोलन केले. तर नवादातील बुंदेलखंड पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक रोखली आहे.

बिहारमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक रोखली आहे. अररिया, दरभंगा आणि वैशालीमध्ये रेल्वे वाहतूक थांबवून कार्यकर्त्यांनी रस्ते वाहतूकही बंद केली आहे. आंदोलन तीव्र स्वरूप धारण करत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाटणामध्येही आंदोलन होत असून कार्यकर्त्यांनी टायर जाळले आहेत. तसेच जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. ‘ मी हिंदू आहे, हिंदुस्थानी आहे. मी नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आहे. बिहार बंद’, असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात उत्तरप्रदेशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मेरठमधील 4 जणांचा समावेश आहे. मेरठमधील सर्व 9 जिल्हे अतिसंवेदनशील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मेरठ, मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि सहारनपूरसह 21 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मेरठ, मुजफ्फरनगर आणि बुलंदशहरमध्ये शुक्रवारी हिंसक आंदोलन झाले. त्यात 250 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून मोठ्या प्रमणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर पोलिसांना 50 राऊंडपेक्षा जास्त गोळीबार करावा लागला. या हिंसाचार प्रकरणी 13 एफआयआर दाखल झाले असून आरोपींविरोधात एनएसएनुसार कारवाई करण्यात येणार आहे. लखनऊमध्ये आतापर्यंत 218 जणांना अटक करण्यात आली आहे. गाझियाबादमध्ये 3600 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहरायिचमध्ये 38 जणांना अटक करण्यात आली आहे.

फरीदाबादमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वकिलांनी मोर्चा काढला. दिल्लीतील जामिया विद्यापीठाबाहेर पुन्हा एकदा नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. सीमापुरी भागात दगडफेक करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील दरियागंजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता 15 वर पोहचली आहे. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये 3 ते 6 वाजेपर्यंत कर्फ्यूमध्ये सूट देण्यात आली आहे. रविवारी दिवसभर कर्फ्यू लागू नसेल तर 23 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये आंदोलनकांवर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. तामिळनाडू एमजीआर चैन्नई रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडल्या.