
बेकायदा बाईक टॅक्सींमुळे जिवघेण्या अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. संबंधित बाईक टॅक्सींना परिवहन विभागातील भ्रष्ट अधिकारी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र कामगार सभेने सोमवारी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी परिवहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करतानाच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनात शेकडो कॅबचालक आणि रिक्षाचालक सहभागी झाले होते.
रॅपिडो-उबेरसारख्या कंपन्यांच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सीविरोधात राज्यातील कॅबचालक आणि रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परवानगी नसतानाही रॅपिडो कंपनी पांढऱ्या नंबर प्लेटवरील दुचाकींचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी बेकायदेशीर वापर करीत आहे. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागाने बेकायदा बाईक टॅक्सींना रोखणे आवश्यक आहे. मात्र ओला, उबेर व रॅपिडोसारख्या कंपन्यांवर परिवहन विभागाचा अंकुश नसल्यामुळे या कंपन्या राज्यभर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा चालवत असल्याचा दावा महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला. याच अनुषंगाने सोमवारी दुपारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मिलिंद काजळे, आकाश गायकवाड, अनुराग गुप्ता, अवी कुरुंद, आनंद बोबडे, विजय मिश्रा, इफ्तिकार अहमद, आनंद वाकोडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कॅब आणि रिक्षाचालक सहभागी झाले होते.
राज्यभरात तीव्र आंदोलन करणार
परिवहन विभागातील भ्रष्टाचार न थांबल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी बेकायदा बाईक टॅक्सी त्वरित बंद करा, संबंधित कंपन्यांवर एफआयआर दाखल करा, परिवहन विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा विविध मागण्यांकडे कॅबचालक आणि रिक्षाचालकांनी लक्ष वेधले.


























































