
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे 66 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रिंग रोड उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसह नाशिक, पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्याने ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉइंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर-दक्षिण जोडणी करत 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून ऑरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन-विरार सागरी सेतू आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेसाठी भूसंपादन
विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देण्यास आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.






























































