
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. तब्बल 4 लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील उभी पीके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते खचल्याने दळणवळण व्यवस्था खंडित झाली आहे. पिण्याचे पाणीही दूषित झाल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे राज्यपालांचे लक्ष वेधले.