15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार, वाचा बातमी

देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता सरकारने एक निर्णय घेतला आहे. टेलिकॉम विभागाने एअरटेल, जिओसह सर्व टेलिकॉम कंपन्यांना यूएसएसडी कोड्सचा अंतर्भाव असलेली कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांतर्गत 15 एप्रिल 2024नंतर कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्यात येणार आहे.

यूएससडी कोड म्हणजे काय?
हा एक शॉर्ट कोड आहे. या कोडद्वारे यूजर्स बॅलन्स किंवा फोनचा आयएमईआय क्रमांक जाणून घेऊ शकतात. हा कोड अशी सोय आहे, ज्याला डायल करून कोणत्याही नंबरवर कोणतीही सुविधा अॅक्टिव्ह किंवा इनअॅक्टिव्ह करता येते. कॉल फॉरवर्डिंग ही अशी सोय आहे, ज्यात एका क्रमांकावर आलेला फोन अन्य क्रमांकावर फॉरवर्ड केला जाऊ शकतो. एखादा युजर जर *401# हे क्रमांक डायल करून जर एखाद्या अनोळखी क्रमांकावर कॉल करतो, तर त्याला येणारे कॉल्स हे त्या क्रमांकावर फॉरवर्ड होतात. म्हणजेच तुमच्या कॉल मेसेजचा अॅक्सेस दुसऱ्याच्या हाती जातो. याच सुविधेचा वापर करून अनेक स्कॅमर्स सध्या ऑनलाईन फसवणूक करत आहेत.

याच क्रमांकाचा वापर करून ओटीपी, बँकेचे ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया याचाही अॅक्सेस दुसऱ्याकडे जातो. त्यामुळे थेट आर्थिक नुकसान होऊ शकतं. याचमुळे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.