
तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अंदाजे 30 लाख रुपये किमतीचा 90 किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी (वय 37), सागर वाल्मिक पाझारे (वय 26, दोघेही रा. वरोरा) अशी अटकेतील आरोपी ची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यापूर्वी याच परिसरात दोन कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यात पहिल्या कारवाईत 74 किलो, तर दुसऱ्या कारवाईत 8 किलो गांजा जप्त करण्यात आलेला. तेलंगणा राज्यातून गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. एक पथक तयार करण्यात आले. हे पथक मागील चार दिवसांपासून राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलात ठाण मांडून होते. चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोघांकडे गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी दोघांना अटक केली तर अन्य दोघे सुमारे 10 किलो गांजा घेऊन पसार झाले. राजुरा पोलीस ठाण्यात अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. फरार दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.


























































