उडत्या विमानावरील स्टंट महागात पडला, खाली पडल्याने गायकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्याकडे चालत्या रेल्वेवर, लोकलमध्ये स्टंट करताना अनेक अपघात होऊन तरुणांनी जीव गमवावा लागला आहे. अशाच प्रकारची एक घटना कॅनडामध्ये घडला असून विमानाच्या पंखांवर म्यूझिक व्हिडीओ शूट करताना खाली पडल्यानं तरुण गायकाचा मृत्यू झाला आहे. जॉन सेम्स मॅकमुरे असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 34 वर्षीय गायकाचं नाव आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी एका विमानाच्या पंखांवर म्यूझिक व्हिडीओ शूट सुरू होते. याच दरम्यान अचानक मॅकमुरेचा पाय घसरला आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याने पॅराशूट खोलण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो यात अपयशी ठरला. खाली कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मॅकमुरेच्या मॅनेजरने याबाबत माहिती देताना सांगितलं की, या स्टंटसाठी त्याने प्रशिक्षणही घेतलं होतं.

मॅकमुरे या गायकाला त्याच्या खास स्टंट्ससाठी ओळखलं जात होतं. म्यूझिक व्हिडीओदरम्यान स्टंट करणं ही त्याची खासीयत होती आणि स्टंट गाण्याचा एक भाग असल्याचं तो मानत असे. यापूर्वी ‘द मॅन’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याने एका विमानावरून उडी मारली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता.