
कर्करोग ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या टाटा ट्रस्टने जागतिक कर्करोग दिवसानिमित्त कर्करुग्णांच्या चळवळीत आणखी एक पाऊल टाकलं आहे. कैसे का कॅन्सर या नवीन अभियानातून कॅन्सरवरील उपचारांना बळ देण्यात येणार आहे. लहान शहरं तसंच गावांमध्ये कर्करुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेच्या भावनेवर मात करण्यासाठी जागृती, उपचारांची सुविधा, दर्जेदार सेवा आणि माफक किमती या चतुःसूत्रींवर या अभियानात काम करण्यात येणार आहे.
या अभियानात तीन चित्रपट दाखवण्यात येणार असून कर्करोगाची लक्षणे, निदान आणि निदानानंतर रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यात भाष्य करण्यात येणार आहे. तसंच ट्रस्टतर्फे रुग्णांना मिळणाऱ्या सेवा तसंच सुविधांविषयीही जनजागृती करण्यात येणार आहे.


























































