लातूर जिल्ह्यातील सहाही जागांवर भाजपाचा झेंडा फडकवावा : बबनराव लोणीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला अनेक धुरंदर नेते दिले आहेत. यापुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला हा जिल्हा आता भाजपाचा गड मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता जिल्हा असलेल्या लातूरातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्याकरिता अनेकजण इच्छुक असले तरी पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील राहून सहाही विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवावा असे आवाहन पाणी पुरवठामंत्री आणि भाजपाचे पक्षनिरीक्षक बबनराव लोणीकर यांनी केले.

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भाजपातर्फे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती बबनराव लोणीकर यांनी घेतल्या. या मुलाखतीपुर्वी भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव, रमेश कराड, अभिमन्यु पवार, दिलीपराव देशमुख आदिंची उपस्थिती होती.

लातूर जिल्हा भाजपाचा गड झालेला असून येथील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच या जिल्ह्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे. भाजप पक्ष मोठा झालेला असून पक्षाचे कार्यही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासोबतच संघटनच्या माध्यमातून पक्षाची शक्ती वाढली असल्याने विधानसभा निवडणुक लढविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक पाहता आगामी होणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची असून लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक वेगळी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडून येण्याचा निकष आणि मतदारसंघातील परिस्थिती यावरच उमेदवार कोण असणार याचा निर्णय पक्ष घेणार आहे. मात्र, पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो सर्वांशी बांधील असून कोणीही पक्षविरोधी वक्तव्य अथवा काम करू नये याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगीतले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याला हजारो कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालेला असल्याने जिल्ह्याचा विकास होत आहे. अधिक विकास होवून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास योजना पोहचाव्यात यासाठी आगामी विधानसभा निवडणुका जिंकणे आपले लक्ष्य असून याकरिता प्रत्येकांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती बबनराव लोणीकर यांनी घेतल्या. सहा विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे 111 जणांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले.