
सामना ऑनलाईन । मुंबई
कॅन्सर हा मानवजातीचा प्रमुख शत्रू ठरणाऱया रोगाविरुद्धचा लढा खेळाच्या मैदानातून छेडण्याचा स्तुत्य उपक्रम सार्थ प्रतिष्ठान आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाने रविवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजित केला होता. ज्येष्ठ शिवसैनिक दिवंगत महेश बोभाटे यांनी स्थापन केलेल्या सार्थ प्रतिष्ठानने आपली सेवाभावी उपक्रमांची मालिका अखंडित राखत यंदा टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सहकार्याने मुंबईत आयोजित केलेल्या भव्य कॅन्थॉन मॅरेथॉनला मुंबईसह महाराष्ट्रातील पाच हजार धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. 3 फेब्रुवारीला भल्यापहाटे शिवाजी पार्कवरून हजारो मुंबईकर ‘खेळाला साथ आणि कॅन्सरला मात’ हा बहुमूल्य संदेश देत मुंबईत धावले. एकूण कर्करोगविरोधी प्रचारासाठी आयोजित हा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला.
रविवारी पहाटे 5 वाजता दादरचे शिवाजी पार्क मैदान हजारो धावपटूंनी फुलून गेले होते. निमित्त होते कॅन्सरविरोधी जनजागृती करण्यासाठी आयोजिलेल्या कॅन्थॉन मॅरेथॉनचे. सार्थ प्रतिष्ठानचे मुख्य कार्यवाहक खासदार अनिल देसाई यांनी झेंडा दाखवून 21 कि.मी., 10 कि.मी. आणि 5 कि.मी. अशा अंतराच्या मॅरेथॉन दौडीचे उद्घाटन केले. स्पर्धेत नामवंत धावपटूंसह अल्ट्रा रनर नझमिनझ फरसह शेकडो कॅन्सरमुक्त रुग्णही या मॅरेथॉनमध्ये धावले. कॅन्सरवर जिद्दीने मात करता येते याचे प्रत्यंतर त्यांनी मुंबईकरांना घडवले.
पहाटे 5 वाजता श्री समर्थ व्यायाम मंदिर येथून सुरू झालेली ही मॅरेथॉन वरळी, हाजी अलीमार्गे परत शिवाजी पार्कला परतली. मॅरेथॉनमध्ये अनेक विदेशी धावपटूही सहभागी झाले होते. या मॅरेथॉनप्रसंगी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख- आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, महिला उपविभाग संघटक दीपा पाटील, निरंजन नलावडे, रामदास पारकर, बाळा कोपडे, टाटा रुग्णालयाचे अधिकारी तिवारी, प्रवीण पंडीत हे मान्यवर उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित होते. विजेत्या धावपटूंना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपविभागप्रमुख गोपाळ शेलार, शाखाप्रमुख अजित कदम, स्थानीय लोकाधिकार महासंघाचे चिटणीस वामन भोसले, उल्हास लाड, उल्हास बिलये, महेश लाड उपस्थित होते.
गुलाबी रंगाने न्हाऊन गेले शिवाजी पार्क
सार्थच्या कॅथॉन मॅरेथॉनच्या नेटक्या आयोजनामुळे अखंड शिवाजी पार्क मैदान कॅन्सरमुक्तीचे प्रतीक असणाऱया गुलाबी चिन्हांचे बॅनर आणि फ्लेक्समुळे गुलाबी रंगात न्हाऊन गेले होते. सहभागी स्पर्धक आणि उपस्थित नागरिकांनी कॅन्सरच्या खात्म्याचा लढा तीव्र करण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करावे अशी भावना व्यक्त केली.
या मॅरेथॉनला सारस्वत बँक, एलआयसी, न्यू इंडिया ऍश्युरन्स, बँक ऑफ बडोदा, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएण्टल इन्शुरस आणि इंडियन ऑईल यांचे विशेष सहकार्य लाभले होते. सार्थ प्रतिष्ठानचे विश्वस्त दिनेश बोभाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश नाईक, मंगेश कदम, श्याम चित्रे, प्रथमेश बोभाटे, अजय पथरोड, विलास जाधव, अमोल मठकर, राजेश वराडकर, अमोल लोंढे, श्रीराम विश्वासराव, नितीन शिरोडकर, मनोज वारंग, मिनेश बोभाटे, अमोल कदम, स्वप्नील पांगळे, रितेश बाळा लोकरे आणि सागर वराडकर या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.





























































