पाकड्यांनी मसूद अझहरला पकडून दाखवावे; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे इमरान खानला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदीगढ

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागितल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी इमरानवर कठोर शब्दांत पलटवार केला आहे. दहशतवादी मसूद अझहर पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये लपला आहे. इमरान यांनी त्याला पकडण्याचे धाडस दाखवावे, त्यांना ते शक्य नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही ते काम फत्ते करू असे त्यांनी इमरान यांना खडसावले. इमरान हिंदुस्थानकडे पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. मात्र, 26/11 मुंबई हल्ल्याचे पुरावे आम्ही दिले होते. त्याचे काय झाले ते इमरान यांनी स्पष्ट करावे असा सवालही त्यांनी केला.

इमरान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा इन्कार करत या हल्ल्याचे पुरावे मागितले आहे. त्यानंतर लगेचच अमरिंदरसिंग यांनी ट्विट करत इमरान यांच्यावर पलटवार केला आहे. मसूद पाकिस्तानातील बहारवलपूरमध्येच असून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) मदतीने हिंदुस्थानविरोधात कारवाया करत आहे. इमरान यांच्यात धमक असेल तर त्यांनी आधी मसूदला पकडावे. तुम्ही त्याला पकडू शकत नसाल, तर आम्हाला सांगा, तुमच्यासाठी आम्ही हे काम फत्ते करू असा पलटवारही त्यांनी केला आहे. आम्ही मुंबई हल्ल्याचे अनेक पुरावे पाकिस्तानला दिले आहे. त्याचे काय झाले ते आधी स्पष्ट करावे असे ते म्हणाले. तुम्ही जे बोलता तसे आधी करून दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले.

इमरान खान यांनी मंगळवारी एक संदेश जारी करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी या संदेशात कश्मीर राग आळवला आहे. हिंदुस्थान कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करत आहे असे ते म्हणाले. हिंदुस्थानने पाकिस्तावर कोणतीही लष्करी कारवाई केली, तर पाकिस्तानही त्याला चोख प्रत्युत्तर देईल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. हिंदुस्थानात निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी तेथील नेते पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करत आहेत. जगात असा कोणता कायदा आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती एखाद्या देशाविरोधात अशी कारवाई करू शकते असा सवालही त्यांनी केला. हिंदुस्थानने आमच्यावर कारवाई केली, तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ, त्यानंतर जे हाईल त्याची जबाबादारी हिंदुस्थानची असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.