प्रो कबड्डीचे विजेतेपद हेच ध्येय, पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारचे स्वप्न

‘पुणेरी पलटणला प्रो कबड्डीच्या  दहाव्या हंगामाचे जेतेपद जिंकून देणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याची’ भावना कर्णधार अस्लम इनामदारने व्यक्त केलीय. त्याच दृष्टीने त्याने पावले टाकताना प्रो कबड्डीतील सर्वात यशस्वी पटना पायरेट्सचा 37-21 असा धुव्वा उडवत त्याने पुणेरी पलटणला प्रथमच अंतिम फेरी गाठून दिली आहे. आता जेतेपदासाठी 1 मार्चला हरयाणा स्टीलर्सबरोबर त्यांची जेतेपदाची झुंज रंगणार आहे.

13 वर्षांपूर्वी नगर येथील टाकळीभान या छोटय़ाशा गावात आपल्या कबड्डीचा ‘क’ सुरू करणाऱया अस्लमने आपल्या अभूतपूर्व खेळाच्या जोरावर प्रो कबड्डीच्या संघाच्या कर्णधारपदापर्यंत झेप घेतली आहे. त्याने 2010 मध्ये शाळेमधून कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि मग जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कबड्डीपर्यंत पोहोचला. हिंदुस्थानी कबड्डी संघासाठी त्याने आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले.

अस्लमची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. 2011 साली वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने पाच मुलांना घरकाम करून शिकवले. आपल्या आईला मदत करण्यासाठी अस्लमने लहान वयातच रात्रभर शेतावर काम करणे, दिवसा हॉटेलमध्ये काम, काहीकाळ चहासुद्धा विकला. त्यानंतर तो शाळेत जायचा. यातून तो वेळ काढून कबड्डी खेळायचा. त्याचा मोठा भाऊही कबड्डीपटू होता. त्यामुळे त्याने अस्लमलाही कबड्डीचे धडे दिले. खर्या अर्थाने अस्लमचा खरा मार्गदर्शक तोच होता.

अस्लमचा कबड्डीचा संघर्ष न संपणारा असाच आहे. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही, याची जाणीव असल्यामुळे त्याने कष्टाची साथ कधीच सोडली नाही. त्याचे प्रशिक्षक राजू कोर्टे यांनीच त्याला ठाण्यातील ठाणे जिह्यात आणले आणि त्याची राहाण्याची सोय केली. त्यामुळेच अस्लमला व्यावसायिक कबड्डी खेळता आली. तसेच अशोक शिंदेच्या सहकार्यामुळे तो एअर इंडियाकडून खेळला आणि येथूनच तो नावारूपाला आला. पुढे रेल्वे आणि युनियन बँकेकडूनही तो काही काळ खेळला. त्यानंतर ‘युवा पलटण’ मोहिमेच्या माध्यमातून त्याने ‘पुणेरी पलटण’ गाठले आणि तो प्रो कबड्डीत चढाईला पोहोचला आणि त्याने आपल्या याच चढाईच्या जोरावर पुणेरी पलटणला अंतिम फेरी गाठून दिली आहे. आता तो आपल्या ध्येयासमीप पोहोचलाय आणि तो ते साध्यही करील, असा दृढ आत्मविश्वासही त्याने व्यक्त केलाय.

अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे सदस्य राजू डिगे यांचा मुलगा आदित्य डिगे नुकत्याच केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकून दिल्याबद्दल शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार अजय चौधरी, शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी आमदार दगडू सकपाळ आणि दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक समन्वयक सुधीर साळवी उपस्थित होते.