
प्रेमाच्या त्रिकोणातून दुचाकीस्वार तरुणाच्या अंगावर भरधाव कार घालण्याचा धक्कादायक प्रकार यशवंतनगर येथे काल मध्यरात्री घडला.
नीलेश दिलीप शिंदे ( 30, रा. गवळीमाथा, भोसरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे (41, रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. शरद जगन्नाथ टिळक (25, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. नीलेश याचे एका तरुणीशी ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्या तरुणीचे काळे याच्यासमवेत प्रेमसंबंध निर्माण झाले. सोमवारी रात्री नीलेश तरुणीला भेटायला यशवंतनगर येथे आला होता. तेथे त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे तरुणीने काळे याला बोलावले. नीलेश हा दुचाकीवर घरी जात असताना काळे याने त्याच्या कारने त्याला उडविले. यामध्ये नीलेश हे गंभीर जखमी झाले.



























































