
सॅट्रो कार आणि खासगी ट्रव्हल्सच्या धडकेत कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळ रविवारी मध्यरात्री दोन वाजता घडली आहे. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रव्हल्सचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
केशव विलास बोऱहाडे (वय 25, रा. मंठा, जि. जालना), परमेश्वर लक्ष्मण काळे (वय 40, रा. धामणगाव, जि. परभणी), बाबासाहेब शंकर कदम (वय 60, रा. जायगाव, जि. बीड) या तिघांचा जागीच तर विनोद धावणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बोऱहाडे, काळे, कदम आणि धावणे हे सॅन्ट्रो कारमधून स्थळ पाहण्यासाठी परभणी येथील नातेवाईकांकडे गेले होते. तेथून ते पुण्याकडे निघाले होते. तर खासगी ट्रव्हल्स पुण्याहून नांदेडकडे जात होती. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात बोऱहाडे, काळे, कदम यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असणाऱया विनोद धावणे यांना पाथर्डी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ट्रव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप असून, ट्रव्हलचालक फरार झाला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे परिसरात मोठा आवाज झाला. यावेळी अनिल पालवे, रमेश क्षेत्रे, प्रमोद क्षेत्रे यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी पाथर्डी येथील रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक गिरी, गोल्हार, कराड, पोटे, कांबळे, आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली. पाथर्डीचे पोलीस अधिकारी परमेश्वर जावळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
ठेकेदार, अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगरपासून पाथर्डीपर्यंतचे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवताना आजवर अनेक अपघात झाले असून, दिडशेहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व महामार्गाच्या अधिकाऱयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी केली आहे.




























































