
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी 3 जुलै रोजी अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाची पादचारी मार्गिका पडल्यानंतर 29 उड्डाण पूल आणि 115 पादचारी पुलांचे सेफ्टी ऑडिट केले असून त्यापैकी 23 उड्डाणपुलांचा तर 48 पादचारी पुलांचा विस्तृत सुरक्षा अहवाल प्राप्त झाला आहे. नवे पूल बांधताना गंज लागू नये म्हणून स्टेनलेस स्टील, उच्च प्रतीचे काँक्रीट तसेच मजबूत पण वजनाने हलक्या कार्बनचा वापर प्रथमच करण्यात येणार आहे.
या पाच पुलांसाठी कार्बनचा वापर
गोखले पुलाची कँटीलिव्हर पादचारी मार्गिका युटीलिटी केबल आणि पेवरब्लॉकच्या भाराने पडली. त्यामुळे धारावी, अंधेरी आणि मालाड येथील उड्डाणपुलांच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी कार्बनचे तुकडे वापरण्यात येणार आहेत. हे कार्बनचे मटेरियल स्टीलच्या तुलनेत पाचपट मजबूत असून त्याचे वजन एकदम कमी आणि मजबुती जास्त असल्याने त्यांचा वापर होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेने अलीकडेच गोखले पुलाच्या गर्डरची दुरुस्ती केली असून दोन्ही पादचारी मार्गिकांची दुरुस्ती पूर्ण करून तो वापरासाठी खुला केला आहे.

























































