शस्त्राचा धाक दाखवत केअर टेकरनेच केली ज्येष्ठ दाम्पत्याची 11 लाखांची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथरूड परिसरात एका बंगल्यात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्यानेच ज्येष्ठ दांपत्याच्या बंगल्यात प्रवेश करून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याजवळील 11 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी 74 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड परिसरातील जय भवानीनगर भागात तक्रारदार पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत असून मुलगी बावधान परिसरात राहते. त्यांनी घराच्या देखभालीसाठी केअरटेकर ठेवला होता. काही दिवसांपूर्वी त्याने काम सोडले होते. घरात काम केल्यामुळे त्याला घराची पूर्ण माहिती होती.

गुरुवारी रात्री केअर टेकर दोन साथीदारांसह घरात शिरला. त्याने तक्रारदारांना शस्त्राचा धाक दाखवत शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर बेडरूमचा कपाटातील रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा एकूण 11 लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरून नेला. तक्रारदारांनी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.