दहावीनंतर करीअर निवडीबाबत स्पष्टता नाही, अकरावी प्रवेशासाठी 100 गुणांची सीईटी नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना करीअर निवडीबाबत स्पष्टता मिळणार नसल्याचे मत पुणे येथील ‘सिस्कॉम’ संघटनेने व्यक्त केले आहे. त्यामुळे केवळ 100 गुणांची सीईटी परीक्षा घेण्यापेक्षा शास्त्र्ा, भाषा, इतिहास, भूगोल आणि गणित या विषयांची सीईटी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

दहावीसाठी सहा विषय असल्याने सीईटीच्या 100 गुणांमध्ये सर्व विषयांचा समावेश नेमका कसा करता येईल याबाबत संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शंका व्यक्त केली. तसेच ही परीक्षा एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने दोन भागांत घ्यावी. यामुळे एकत्र विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल, सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश देता येईल तसेच विद्यार्थी कोणत्या विभागात उत्तम करीअर करू शकतो याचा विद्यार्थी व पालकांना अंदाज घेता येईल, असेही बाफना यांनी स्पष्ट केले.

सीईटी मोफत असावी

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परीक्षेसाठी शुल्क घेतलेले आहे. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा मंडळाकडे विद्यार्थ्यांचे हे शुल्क जमा असल्याने सीईटी परीक्षा मोफत घेण्यात यावी, अशी मागणीही ‘सिस्कॉम’ने केली आहे.