कुडाळमध्ये 30 नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय मानांकन कॅरम स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व कै.नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य कॅरम मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा महिला एकेरी व पुरूष एकेरी अशा दोन गटात होणार असून नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. एकाचवेळी 32 कॅरमबोर्डवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरूण केदार व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अवधूत भणगे यांनी कुडाळ येथे दिली. कुडाळ येथे  आयोजित पत्रकार परिषदेत केदार व भणगे यांनी ही माहिती दिली.

केदार म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीला जिल्हा कॅरम असोसिएशनने सुरूवात केली आहे. विश्वविजेते योगेश परदेशी व प्रशांत मोरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाझ अकबरअली, महम्मद गुफरान, संदीप देवरूखकर, काजल कुमारी, आयेशा महम्मद, सिंधुदुर्गचे सुपुत्र राष्ट्रीय विजेते ज्येष्ठ कॅरमपटू सुहास कांबळी या नामवंत खेळाडूंसोबत राज्यस्पर्धेत नैपुण्य दाखविणारे पंकज पवार, अभीजित तिरपणकर, योगेश धोंगडे, फहीम काझी, प्रिती खेडेकर, मिताली पिंपळे आदी नामवंत खेळाडू यावेळी सहभागी होणार आहेत. अॅड. भणगे यांनी स्पर्धची संकल्पना विशद केली. स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्वजण मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.