व्यापाऱ्याला मारहाण करून सोने लुटणाऱ्या टोळीवर मोका; पोलीस आयुक्तांचा दणका

दुचाकीस्वार कडधान्य व्यापाऱ्याला मारहाण करून चार लाखांचे दागिने लुटणाऱ्या टोळीविरूद्ध मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टोळीप्रमुख गणेश काविश पवार (वय 19), कृष्णा बबन लोखंडे (वय 20), अजय भागवत घाडगे (वय 20), शुभम उमेश अबनावे (वय 21), गणेश दिपक रेणुसे (वय 21), प्रज्योत पांडुरंग भोसले (वय 21) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिलीप किसन भोंगळे (वय 52) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दिलीप 23 जानेवारीला दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात गाडी आडवी का लावली, गाडी जरा बाजुला घ्या, असे म्हणत त्यांच्या मानेवर हाताने रपाटा मारला. चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दिलीप यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी संपुर्ण टोळीविरूद्ध मोका कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजु अडागळे, दिगंबर शिंदे , गोरख दरेकर, प्रविण शिंदे, अमोल घावटे, विजय कराड, प्रशांत नरसाळे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या