पोलीस असल्याची बतावणी करत युवकाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालूक्यात पोलीस असल्याची बतावणी करत युवकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील मौजे केळगाव येथे किराणा दुकानात बसलेल्या युवकाला चारजण बळजबरीने जीपमध्ये घालून नेत होते. युवकाच्या वडिलांनी विचारणा केली असता ”आम्ही पोलीस आहोत, चौकशीसाठी तुमच्या मुलाला घेऊन जात असून उद्या पोलीस ठाण्यात या” असे सांगितले आणि ते चौघे युवकाला घेऊन निघून गेले. मात्र, त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत युवकाचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निलंगा पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विठ्ठल भानुदास काळे (रा. केळगाव, ता. निलंगा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 5 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कुटूंबासह जेवत होते. त्यांचा मुलगा गहिनीनाथ किराणा दुकानात बसला होता. अचानक एकजण दुकानात आला व त्याने गहिनीनाथच्या कॉलरला धरुन त्याला दुकानाबाहेर काढले आणि बळजबरीने गाडीमध्ये बसवले. गहिनीनाथच्या ओरडण्याच्या आवाजाने काळे घराबाहेर आले. त्यांनी काय झाले, माझ्या मुलाला का ओढून नेत आहात, असे विचारले. तेव्हा त्या चौघांनी ”आम्ही पोलीस आहोत. चौकशीसाठी तुमच्या मुलाला घेऊन जात आहोत, सकाळी निलंगा पोलीस ठाण्यात या” असे सांगितले आणि मुलाला गाडीत बसवून घेऊन गेले,” अशी तक्रार काळे यांनी दाखल केली आहे. दुसऱ्या दिवशी निलंगा पोलीस ठाण्यात चौकशी केली असता निलंगा पोलिसांनी चौकशीसाठी कोणालाही आणले नसल्याचे समजले. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करत मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे काळे यांना समजले. अज्ञात चारजणांनी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार काळे यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.