
श्रीरामपूर व राहाता नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावीत यांच्यावर माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील नगर परिषदेत खळबळ उडाली आहे. या ठिकाणी त्यांनी काही घोटाळा केला का, या बाबत पोलीस तपास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावीत यांची श्रीरामपूर नगर परिषदेतील कारकिर्द वादग्रस्त ठरली. खासदार सदाशिव लोखंडे यांना चुकीची माहिती दिली म्हणून गावीत यांना धारेवर धरले होते. पालिकेच्या सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहतो, करतो, माहिती घेतो, अशी देत असत. यावरुन नगरसेवक व गावीत यांच्यात खडाजंगी उडाली होती. गावीत यांनी एका ठेकेदाराला मोठ्या धनादेश चेक दिला होता. यावरुन बराच गदारोळ झाला होता.
माजलगाव नगरपरिषदेत 22 रस्त्यांची व नाल्यांची कामे न करता 1 कोटी 61 लाख 10 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी अपहार व फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. यावरुन पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी वी.सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर, अभियंता महेश कुलकर्णी या तिघांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.






























































