
खोटा व बनावट दस्तावेज तयार करून तो खरा आहे असे भासवून गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक करून 15 कोटी 75 लाख 33 हजार 338 रुपये हडप करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गंगापूर सहकारी साखर कारखाना 2007/8 पासून बंद आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीपोटी कारखाना जप्त केला आहे. बँकेने कारखाना विक्रीसाठी काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने सदरील विक्री व्यवहाराच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली होती. त्या न्यायालयीन कारवाई अंतर्गत न्यायालयात गंगापूर कारखान्याच्या वतीने 9 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. कोर्टाने ती रक्कम कारखान्यास परत केली असून, सदरची रक्कम व्याजासह 15 कोटी 75 लाख 33 हजार 338 रुपये एवढी आजपर्यंत झालेली आहे. ही रक्कम 7 नोव्हेंबर 2020 रोजी गंगापूर सहकारी साखर कारखान्यास परत मिळाली होती.
कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी.एम. पाटील यांनी संगनमताने 20 जुलै 2020 रोजी बेकायदेशीररीत्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे खाते उघडले हे खाते उघडण्यासाठी कारखान्याचा ठराव घेण्यात आला होता तो ठराव देखील बनावट बेकायदेशीर असल्याचे म्हटले.

































































