
मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या अखत्यारीतील रस्ते पाण्याने धुण्यास सुरुवात करण्यात आली असून आता मुंबईतील दोन हजार किमीपैकी एक हजार किमी रस्ते पाण्याने धुण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईभरात 200 पाण्याच्या टँकरचा वापर केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ प्रमुख कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना गती दिली आहे. यामध्ये सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फुटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुऊन काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. यातील सुमारे 650 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करून धुऊन काढण्याचे काम सध्या केले जात आहे. यासाठी पाण्याचे 121 टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. तर आता या कामाची व्याप्ती वाढवण्यात येणार असून एक हजार किमी रस्ते धुण्याचे काम केले जाणार आहेत.
पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर
रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ- पीक अवर्स) विशेषतः पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात ही कार्यवाही केली जात आहे.
























































