
1990 मध्ये व्ही. पी. सिंग हे पंतप्रधान असताना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ओबीसींना नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण मिळाले. त्यांच्या मंडलला विरोध म्हणून भाजपने राम मंदिर आंदोलन पुढे करून मंडल विरुद्ध कमंडल सुरू केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातनिहाय जनगणना करून त्याला कमंडल विरुद्ध मंडल असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बिहारचे मुख्य सचिव आमीर सुबलानी यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून बिहारमधील जातनिहाय जनगणनेचा अहवाल आज जाहीर केला. त्यानुसार बिहारमध्ये इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) लोकसंख्या एकूण 63 टक्के आहे. ओबीसींमध्येही मागास 27 टक्के तर अतिमागास 36 टक्के असे प्रमाण आहे. अनुसूचित जातीची (एससी) लोकसंख्या 19.65 टक्के आहे. अनुसूचित जमातीची (एसटी) लोकसंख्या 1.68 टक्के इतकी आहे तर सर्वसाधारण खुल्या वर्गाची (ओपन) लोकसंख्या 15.22 टक्के आहे. बिहारची लोकसंख्या 13 कोटी 7 लाख 25 हजार 310 आहे. यात हिंदुची एकूण संख्या 82 टक्के आहे. तर मुस्लिमांची 17.7 टक्के आहे. इतर लोकसंख्येत बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन धर्मिय आहेत. 2146 लोक हे निधर्मी आहेत. जातीनिहाय जनगणनेचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनगणना टिमचे अभिनंदन केले आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी आनंद व्यक्त केला. आज गांधी जयंती दिनी या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व जण साक्षीदार बनलो आहोत, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.
बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना ही दोन टप्प्यात झाली. पहिला टप्पा 7 जानेवारी ते 21 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात आला. तर दुसरा टप्पा 15 एप्रिल ते 15 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. परंतु, जातीनिहाय जनगणनेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाकडून जातीनिहाय जनगणनेला हिरवा कंदील मिळाल्याने मार्ग मोकळा झाला.
निवडणुकीत परिणाम दिसणार?
बिहारमधील जातीनिहाय जनगणनेचा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 15 विरुद्ध 85 टक्के अशी घोषणा देण्यात आली होती. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीतही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेच्या मागणीला जोर
मुंबई – बिहार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे दबलेल्या उपेक्षित वर्गांना सामाजिक व आर्थिक न्याय देण्याच्या दृष्टीने या अहवालाचा फार मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना (आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक) तातडीने करा, अशी मागणी जनता दल (युनायटेड) राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
जितके प्रमाण तेवढे अधिकार… हाच आमचा शब्द – राहुल गांधी
बिहारमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण 84 टक्के आहे आणि केंद्र सरकारच्या 90 सचिवांपैकी फक्त 3 ओबीसी आहेत जे हिंदुस्थानचे 5 टक्के बजेट सांभाळतात. यामुळेच संपूर्ण देशातील जातनिहाय टक्केवारी जाणणे जरूरी आहे. जितके प्रमाण तेवढे अधिकार… हाच आमचा शब्द आहे, असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केले आहे.
राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी अमृतसरमधील शीख समाजांच्या पवित्र सुवर्ण मंदिराला भेट दिली. मंदिरात माथा टेकवला, प्रार्थना केल्यानंतर शीखांचे सर्वोच्च लौकीक सीट अकाल तख्तला भेट दिली. अन्य भक्तांसोबत लंगर हॉलमध्ये जाऊन भांडी धुण्याची सेवा (स्वेच्छेने) केली. राहुल गांधी यांनी डोक्यावर निळ्या रंगाचा स्कार्फ घालत सुवर्ण मंदिराच्या गर्भगृहात माथा टेकला.
मोदींचे गांधीवंदन
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर गांधींच्या समाधीवर फुले वाहून वंदन केले. भाजपच्या ट्रोलधाडी महात्म्याचे प्रतिमाहनन आणि मूर्तीभंजनात बेभान असताना मोदींनी गांधीवंदन करून या ट्रोलधाडींना शांततेचा संदेश दिला आहे.

























































