पाथर्डी बाजार समितीमध्ये मोठ्या जनावरांचा आठवडे बाजार बंद; लम्पीच्या प्रादुर्भावामुळे निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनावरांमधील लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्या आदेशाने पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवरात दर बुधवारी भरणारा मोठ्या जनावरांचा आठवडे बाजार लम्पी रोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी आपली मोठी जनावरे खरेदी विक्री व्यवहारासाठी बाजार समितीमध्ये आणु नये, अशी माहिती सभापती सुभाष बर्डे यांनी दिली.

सभापती बर्डे म्हणाले की, गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे व तहसिलदार शाम वाडकर यांचे संयुक्त आदेश बाजार समिती प्रशासनाला 25 ऑगस्ट 2023 रोजी प्राप्त झाले असून त्यात म्हटले आहे की, तालुक्यातील हंडाळवाडी परिसरात मोठ्या जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग प्रार्दुभाव झाल्याचे निर्दशनास आले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे जनावरांचा आठवडे बाजार भरल्यास लम्पी चर्मरोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेला मोठ्या जनावरांचा बाजार लम्पी चर्मसाथरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्यात यावा. तसेच बाजार समिती आवारात मोठ्या जनावरांचा बाजार भरणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे. तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार पाथर्डी बाजार समितीच्या आवारातील मोठ्या जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, असे बर्डे यांनी सांगितले.

तालुका प्रशासनाच्या आदेशाने पाथर्डी बाजार समिती आवारातील मोठ्या जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र शेळ्या, मेंढ्या व भुसार मालाचा आठवडे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील.
– सुभाष बर्डे, सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, पाथर्डी