मुंबई पोलिसांच्या बदल्यांची चौकशी करणे गरजेचे आहे! सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने सचिन वाझे तसेच मुंबई पोलिसांच्या केलेल्या बदल्या व त्यांच्या नेमणुकांबाबत माहिती मिळवणे गरजेचे असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या चौकशीचा तो एक भाग आहे असा दावा करत सीबीआयने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अनिल देशमुख यांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावण्यात यावी अशी मागणीही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे

खंडणीच्या कथित आरोपावरून अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले होते. मात्र सीबीआयने थेट अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हाच दाखल केला. सीबीआयने दाखल केलेल्या या गुह्याला विरोध करत राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांमार्फत हायकोर्टात एफआयआरविरोधात याचिका दाखल करण्यात आली. एफआयआरमध्ये निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेणे तसेच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या यासंदर्भातील दोन परिच्छेदांवर राज्य सरकारच्या गृह विभागाने आक्षेप घेतला असून हे मुद्दे एफआयआरमधून वगळण्याची मागणी केली आहे. तसेच सीबीआयला रश्मी शुक्ला यांच्या चौकशीसंदर्भातील कागदपत्रे हवी आहेत. त्यालाही राज्य सरकारने विरोध दर्शविला आहे. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासंदर्भातही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेप्रकरणी सीबीआयच्या वतीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही तसेच देशमुख यांनी बेकायदा पद्धतीने संपत्ती जमवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दाव्यात तथ्य नसून त्यांची मागणी फेटाळून लावण्यात यावी. आहे.